बेभान वारा… Bebhan Wara…

बेभान वारा…

सुटला सर्द बेभान वारा,
स्मृती-ढगांना उधळून गेला,
स्वप्न-पंखांच्या कवेत घेऊन,
डोंगरापल्याड उडवून गेला।

डोंगर-दऱ्या, नदी-नाले, झावळ्या पार ओलांडूनी,
स्मृतींच्या सुगंधाचा मोहक मृदगंध दरवळून गेला।

काळ्या भोर मेघांची चादर, पांघरून, सौदामिनी संगे,
थंड मृगसरींनी माझीये अंग, चिंब चिंब भिजवून गेला।

गालावर कोवळ्या स्पर्शाने, हळुवार लहरींनी गोंजारून,
लडिवाळ उडणाऱ्या बटांना, माझिया कुरवाळून गेला।

वाट पाहता तुझी सख्या रे, सोबतीला होता माझीया,
पापण्यांच्या अश्रू-दवांना,
फुंकर मारून टिपून गेला।

नयनी साठलेले विरहाचे, निशब्द गाणं गुणगुणत,
हृदयीमनी भावनांचे श्वास कोंडून अदृश्य होऊन गेला

तुझ्या मिलना परी जीव माझा,
किती रे बघ आसुसलेला,
क्षितिज किनाऱ्या पल्याड,
मन पाखराला पंखावर घेऊन गेला।

डॉ नम्रता कुलकर्णी
बेंगलुरु
०६/०६/१७

Advertisements

मेघा रे…Megha Re…

मेघा रे, आवर अश्रूंचा आवेग तरी,
भावनांचे फुटले बांध किती ही जरी,
मोतीयांचा सडा पडे वसुंधरे वरी,
अडकल्या भावना त्या काटेरी कुंपणावरी !!!

NK

वाईन आणी व्हिस्की…Wine and Whiskey…

तू उच्चभ्रू, उच्चशिक्षित अशी वाईन जरी,
मी मखमली दमदार मदमस्त व्हिस्कीच खरी।

तुला प्यावयास लागे नाजूक प्याली,
मला मात्र मिळे दणकट ग्लासच भारी।

तुझा जन्म जाहला द्राक्षाच्या मळी,
माझ्या जन्माची कहाणी शेतात खरी।

तू न मिसळते कधी कोणाशी जरी,
बर्फ अन पाणी मात्र माझे सगे सोयरी।

कधी चढे गुलाली,कधी तू चंद्रकांती,
माझी स्थितप्रज्ञता माझी सुर्यकांतीच बरी।

तुझी नशा चढे हळुवार बाई,
माझिया नशेला होते घाईच भारी।

तू कॉकटेल च्या लाऊंज ची राणी,
मी कॉर्पोरेट मीटिंग ला आणते रंगत भारी।

तुझी नी माझी बातच न्यारी,
मैफिलीत चढे आमच्या मुळेच खुमारी।

चियर्स…🍷🥃😁😜

NK